नेट लावून..

टिळक : शिक्षण हक्क आणि अधिकार

ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांना शिक्षणापासून वंचित ठेवले, हा मुद्दा खोडून काढतांना लोकमान्य टिळक आपल्या अग्रलेखात म्हणतात ..... एकाने विद्या, तर दुसर्‍याने द्रव्य पसंत केले ! `प्रत्येक जातीने आपापले हित दक्षतेने पहाणे व त्याकरिता योग्य ती चळवळ करणे जरूर असले, तरी अखिल हिंदी जनतेचा `ब्राह्मण व ब्राह्मणेतर' असा स्थूल विभाग करून जे केवळ ब्राह्मणद्वेषाचे अवास्तविक स्वरूप या वादास देण्यात येत आहे, ते दुष्ट बुद्धीचे आहे. कायदे कौन्सिलातील सर्व जागा किंवा बहुतेक जागा आपणासच असाव्यात, असा हक्क ब्राह्मणांनी पूर्वी केव्हाही सांगितलेला नाही व पुढेही सांगू इच्छित नाहीत. त्यांच्या वाट्याला प्रत्यक्ष व्यवहारात लोकसंख्येच्या प्रमाणाबाहेर जागा पडत असल्या, तर ते त्यांच्या जातिमूलक आग्रहाचे फळ नसून त्यांच्या शिक्षणाचे फळ आहे, ही गोष्ट नाकबूल करणे म्हणजे निवळ आडरानांत शिरणे होय. ब्राह्मणांनी पूर्वी इतर जातींना शिक्षणाच्या बाबतीत मुद्दाम मागे टाकले किंवा दडपून ठेवले हा आरोप सर्वस्वी खोटा आहे. व्यावहारिक शिक्षण व त्याला लागणारी साक्षरता ही क्षत्रिय व वैश्य यांनाच काय, पण शूद्रांनाही खुली होती. पुराण, इतिहास वगैरे वाचण्याचा त्यांचा अधिकार कोणी कधीही काढून घेतला नव्हता. तात्पर्य, वेदाध्यापनाचा तेवढा अधिकार केवळ ब्राह्मणांसच असला, तरी ज्याला हल्ली आम्ही शिक्षण म्हणतो ते कोणत्याही वर्णाला सुलभ होते; म्हणून ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांना शिक्षणरहित ठेवले, या म्हणण्यास काहीच आधार नाही. असे असता शिक्षणाकडे इतर वर्णांनी द्यावे तितके लक्ष दिले नाही. याचे खरे कारण त्यांनी आपापल्या धंद्याकडे विशेष लक्ष दिले व शिक्षणाकडे दुर्लक्ष केले; कारण नुसत्या पुस्तकी कृति दिसण्याला त्या वेळी मान मुळीच नव्हता, हेच होय. आपापल्या धंद्याकडे लक्ष देण्यापासून इतर वर्णांचा आर्थिकदृष्ट्या फार फायदा झाला व ब्राह्मण भेटले की, ते निर्धन व ब्राह्मणेतर म्हटले की ते सधन असा जो सामान्य भेद दिसतो तो त्यामुळेच उत्पन्न झाला आहे. पण या स्थितीस अनुलक्षून `आम्हाला द्रव्योत्पादक धंदा इतर वर्णांनी करू दिला नाही', असे जर ब्राह्मण म्हणतील, तर ती जशी त्यांची चूक होईल तशीच `आम्हांला ब्राह्मणांनी सुशिक्षित होऊ दिले नाही', असे ब्राह्मणेतरांनी म्हणणे हीही चूकच आहे. एकाने द्रव्योत्पादक शिक्षण व द्रव्य पसंत केले. दुसर्‍याने पुस्तकी विद्या व निर्धनत्व पसंत केले, अशी केवळ आपखुषीने पूर्वी वाटणी झाली. याबद्दल परस्परदोष कोणासच लावता येणार नाही.'
- सर्व श्रेय मूळ लेखकांचे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा